परिचय
एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे उमेदवारांमध्ये एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी कुठली भाषा निवडावी मराठी की इंग्रजी याच्या संदर्भात संधीग्धता निर्माण झालेली आहे. या मागचे कारण आहे की, एमपीएससी राज्यसेवेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा ही यूपीएससी मुख्य परीक्षेप्रमाणे वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही एकूण 1750 गुणांची असून अंतिम निवडीसाठी लागणाऱ्या गुणांपैकी (2025 गुण) त्याचे प्रमाण 75 टक्के आहे.उमेदवारांच्या अंतिम निवडीसाठी मुख्य परीक्षेतील गुण अधिक असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी दर्जेदार अभ्यासासोबतच उत्तम लेखन कौशल्य आवश्यक आहे.
Contents
- 1 परिचय
- 2 उपलब्ध भाषा पर्याय
- 3 मराठी व इंग्रजी भाषेतील माध्यमांचे मूल्यांकन
- 4 एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी कुठली भाषा निवडावी? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करावा लागतो:
- 4.1 आयोगाची उमेदवारांकडून असलेली अपेक्षा:
- 4.2 प्रश्नपत्रिकांचे स्वरूप:
- 4.3 स्टडी मटेरियल:
- 4.4 गैरसमज:
- 4.5 प्रमाण भाषा:
- 4.6 जनरल स्टडीज, एथिक्स आणि निबंध पेपर प्रमाणे लिखाणाची अपेक्षा:
- 4.7 विचार करण्याचे माध्यम:
- 4.8 शैक्षणिक पार्श्वभूमी:
- 4.9 भाषा आणि अभ्यास सामग्री (Language vs Content):
- 4.10 तुम्हाला सोयीस्कर असलेली भाषा निवडण्याचे महत्त्व :
- 4.11 मार्गदर्शन घ्या:
- 5 निष्कर्ष
उपलब्ध भाषा पर्याय
MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी उपलब्ध भाषांची यादी- एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार उमेदवारांना त्यांची उत्तरे लिहिण्यासाठी मराठी आणि इंग्रजी यापैकी एक भाषा निवडण्याचा पर्याय दिला आहे.
मराठी व इंग्रजी भाषेतील माध्यमांचे मूल्यांकन
मराठी भाषा निवडण्याचे फायदे आणि तोटे
फायदे:
- महाराष्ट्रातील उमेदवारांना मराठी ओळखीची असल्याने त्यात व्यक्त होणे अधिक सोयीस्कर जाते.
- इंग्रजी प्रमाणे मराठीत देखील दर्जेदार अभ्यास आणि संदर्भ साहित्यांचे निर्मिती झाली आहे आणि होत आहे.
- महाराष्ट्रातील अधिकांश उमेदवारांची विचार करण्याची भाषा मराठी असल्याने जर मराठीत लेखन केले तर ते अधिक प्रभावी होऊ शकते.
मर्यादा:
- मराठीत इंग्रजीतील दर्जेदार संदर्भ साहित्य, वृत्तपत्रे इत्यादींसारखे अभ्यास साहित्य फार मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत.
- मराठी भाषा लिहिताना शब्दातील काना, मात्रा, वेलांटी आणि शब्दावरील टोपी यामुळे इंग्रजीच्या तुलनेने जास्त वेळ लागतो .
- मराठी भाषेचा उपयोग राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी केला तरी निवडक अभ्यास साहित्य हे इंग्रजीतूनच अभ्यासावे लागतात.
- मराठी माध्यमातून उमेदवार जर इंग्रजी भाषेतील संदर्भ ग्रंथ वापरत असतील तर त्याचे मराठीत अनुवाद करण्यासाठी जास्त वेळ लागतो.
- यूपीएससीतील नामांकित क्लासेस मुख्यत्वे इंग्रजी आणि काही प्रमाणात हिंदी भाषेत मार्गदर्शन करतात पण मराठीत नाही.
उपाय:
- लेखनप्रक्रियाः लेखन कौशल्य सुधारण्यासाठी विविध विषयांवर निबंध, सारांश किंवा लहान परिच्छेद लिहा.
इंग्रजी भाषा निवडण्याचे फायदे आणि तोटे
फायदे:
- दर्जेदार संदर्भ साहित्य , उच्च दर्जाचे राष्ट्रीय वृत्तपत्र, इत्यादी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
- इंग्रजी भाषेत टेक्निकल विषय जसे की विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यास करण्यास सोयीचे जाते.
- इंग्रजी जागतिक भाषा असल्याने तिचा उमेदवारांना त्यांच्या शासकीय सेवेत सुद्धा उपयोग होतो.
- एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रश्न हे इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमातून असणार आहेत. परंतु भाषांतरामध्ये काही संधिग्धता आढळल्यास इंग्रजीतील प्रश्न हा अचूक किंवा ग्राह्य धरला जातो.
- एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा लिहिण्यासाठी सोप्या इंग्रजी भाषेचा वापर केला तरी चालतो त्यासाठी फार किचकट इंग्रजी लिहावी लागत नाही.
मर्यादा:
- महाराष्ट्रातील काही उमेदवार इंग्रजी माध्यमात शिकले असले तरी, इंग्रजी ही त्यांची विचाराची प्राथमिक भाषा नसते. त्यामुळे इंग्रजी वाचलेले आणि ऐकलेले समजत असले तरी प्रभावीपणे लिहिण्यास अडचण येऊ शकते.
- काही उमेदवारांना इंग्रजी संदर्भात पुढील अडथळे असू शकतात जसे की, स्पेलिंग मिस्टेक, प्रभावी वाक्यरचना न करता येणे, योग्य शब्द न सुचणे( तोडका शब्द संग्रह), इंग्रजी समजण्यात जास्त वेळ लागणे, इत्यादी.
- काही बाबतीत असे होऊ शकते की उमेदवाराची शब्दसंग्रह खूप चांगले आहेत, इंग्रजी संपूर्ण समजते व वाचता ही येते, परंतु लिहिताना वेगवेगळ्या प्रकारची वाक्यरचना करताना कठीण जात असेल तर अशा बाबतीत उमेदवाराने मराठी भाषेचा वापर केल्यास उपयोग होऊ शकतो.
उपाय:
- नियमितपणे वाचाः इंग्रजी वृत्तपत्रे, लेख आणि पुस्तके वाचा. यामुळे केवळ तुमचा शब्दसंग्रहच वाढत नाही तर तुमची क्षितिजेही विस्तृत होतात.
- शब्दसंग्रह वाढवाः दररोज नवीन शब्द शिका आणि ते वाक्यांमध्ये वापरा.
- लेखनप्रक्रियाः लेखन कौशल्य सुधारण्यासाठी विविध विषयांवर निबंध, सारांश किंवा लहान परिच्छेद लिहा.
- ऑनलाईन साधनेः भाषा एप्स, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि भाषा देवाणघेवाणीचे प्लॅटफॉर्म वापरा.
- बोलण्याचा सराव कराः इतरांशी संभाषणात सहभागी व्हा किंवा मोठ्याने बोलण्याचा सराव करा. उच्चार आणि अस्खलित बोलण्यावर लक्ष केंद्रित करा.
- इंग्रजी चित्रपट/कार्यक्रम पहाः बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीच्या संपर्कात आल्याने ऐकण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.
एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी कुठली भाषा निवडावी? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करावा लागतो:
आयोगाची उमेदवारांकडून असलेली अपेक्षा:
राज्यसेवा मुख्य परीक्षा च्या नवीन अभ्यासक्रमानुसार उमेदवारांच्या लेखन कौशल्यांमध्ये खालील बाबींचा समावेश असावा:- उत्तरेही शब्दांच्या योग्य अर्थासह सुव्यवस्थित, प्रभावी आणि अचूक एक्सप्रेशनने लिहिलेली असावी. म्हणजेच उमेदवारांनी संबंधित, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त उत्तरे लिहिली पाहिजे.
- उमेदवाराला त्यांच्या लेखन कौशल्यातून त्यांची विश्लेषणात्मक आणि दृष्टिकोन ठेवण्याची क्षमता दाखवली पाहिजे.
- उमेदवाराला विषयाचे सखोल ज्ञान असायला हवे, वरवरच्या ज्ञानासाठी गुण दिले जात नाही
- उमेदवाराचे हस्तलेखन सहजपणे वाचण्यायोग्य असावे.
- निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे उमेदवाराकडून अपेक्षित आहे.
प्रश्नपत्रिकांचे स्वरूप:
एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ही यूपीएससीच्या मुख्य परीक्षेकडून प्रेरित आहे त्यामुळे प्रश्नपत्रिकांचे स्वरूप( इथे याचा अर्थ शब्द मर्यादा असा घ्या.) प्रमाणे असेल असे आपण गृहीत धरू.- निबंधाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना तीन तासात 2200 ते 2500 शब्द लिहिणे अपेक्षित असतात.
- उर्वरित चार जीएस पेपर मध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका पेपरमध्ये तीन तासात 4000 शब्द लिहिणे अपेक्षित असतात.
- वैकल्पिक विषयाच्यादोन पेपर साठी देखील प्रत्येकी एका पेपरमध्ये तीन तासात जवळपास 4000 शब्द लिहिणे अपेक्षित असतात.
- या स्थितीत उमेदवाराला प्रचंड मानसिक दबावातून जावे लागते आणि मजबूत मानसिक शक्तीची आवश्यकता असते, या काळात आरामदायक भाषा चांगले उत्तर लिहिण्यास मदत करते.
स्टडी मटेरियल:
दर्जेदार लिखाणासाठी दर्जेदार संदर्भ साहित्य आवश्यक आहेत. इंग्रजी भाषेत दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध आहेत, परंतु मराठीचा विचार केला असता त्यात तुलनेने कमी दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध आहे. परंतु राज्यसेवेच्या नवीन बदलामुळे आता मराठीत देखील दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध होत आहेत.गैरसमज:
- उमेदवारांमध्ये गैरसमज आहे की फक्त इंग्रजी माध्यमातील जास्त उमेदवारांची अंतिम यादीत निवड होते. हा पूर्णतः गैरसमज आहे. यूपीएससीच्या अंतिम या तिचा विचार करता असे लक्षात येते की उमेदवारांची निवड ही भाषेच्या निकषावर झालेली नसून त्यांनी लिहिलेल्या उत्तरांवर झालेली आहे. भाषा फक्त अभिव्यक्तीचे माध्यम आहे. मुख्य परीक्षेत उमेदवारांना मिळणारे गुण हे आयोगाला अपेक्षित असलेल्या मानकांवर अवलंबून असते.(जे अगोदरच्या पहिल्या मुद्द्यामध्ये अधोरेखित केले आहे).
प्रमाण भाषा:
एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी भाषा कशी असावी हे लक्षात घेण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे,- भाषा व्याकरण दृष्ट्या शुद्ध असावी (Grammatically Correct): राज्यसेवा मुख्य परीक्षाच्या पेपरचे मूल्यांकन करणारे परीक्षा हे तज्ञ व्यक्ती असतात, ज्यांचे वय 40 ते 50 वर्षांपेक्षा जास्त असावे. असे तज्ञ व्यक्ती व्याकरण दृष्ट्या शुद्ध नसलेल्या भाषेला फार पसंती देत नाही. उमेदवाराला प्रश्नाच्या मागणीनुसार योग्य ती अर्थपूर्ण वाक्यरचना कमीत कमी वेळात करता यावी.
- शुद्धलेखनातील चुका (Spelling mistakes): मुख्य परीक्षा लिहिणारे उमेदवार हे भावी अधिकारी असतात त्यांच्याकडून शुद्धलेखनातील चुका अपेक्षित नसतात. म्हणजेच उमेदवाराने काही शुद्धलेखनातील चुका केल्या असतील तर परीक्षक त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु अगदी सोप्या शब्दांमध्ये शुद्धलेखनातील चुका असल्यास परीक्षकाला ती गोष्ट आवडू शकत नाही.
- वाक्यरचना (Statement formation): उमेदवारांनी उत्तर लिहिताना वाक्यरचना शब्दांच्या योग्य अर्थासह सुव्यवस्थित, प्रभावी आणि अचूक एक्सप्रेशनने लिहिलेली असावी. म्हणजेच उमेदवारांनी संबंधित, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त उत्तरे लिहिली पाहिजे.
- हस्तलेखन ( Handwriting): उमेदवाराचे हस्तलेखन सहजपणे वाचण्यायोग्य असावे. याचा अर्थ फार सुंदर अक्षर असावे असे नाही, पण शब्दातील प्रत्येक अक्षर हा परीक्षकाला किंवा वाचकाला जोर न देता समजायला हवा. जर उमेदवार स्वतःच्या हस्तलेखन याबद्दल शंका असेल, तर उमेदवाराने त्याचे उत्तर चार ते पाच व्यक्तींना वाचण्यास द्यावे. जर त्या व्यक्तींना उत्तर सहजपणे वाचता येत असतील, तर उमेदवाराचे हस्तलेखन परीक्षेसाठी योग्य आहे असे समजावे.
जनरल स्टडीज, एथिक्स आणि निबंध पेपर प्रमाणे लिखाणाची अपेक्षा:
- जनरल स्टडीज पेपर 1,2 & 3: जनरल स्टडीजच्या या तीन पेपर मध्ये उमेदवाराच्या लिखाण भाषेचा फार कस लागत नाही. कारण की सुरुवात आणि निष्कर्ष परिच्छेद मध्ये लिहावा लागतो आणि मुख्य उत्तर पॉईंट फॉर्म मध्ये लिहिले जाते. त्यामुळे प्रमाण नसलेल्या वाक्यरचनेचा उपयोग करून देखील व्यवस्थित उत्तरे लिहिली जाऊ शकतात.
- निबंध आणि इथिक्स पेपर:या दोन्ही पेपर मध्ये उमेदवारांच्या लेखन कौशल्याचा कस लागतो. निबंध आणि इथिक्स पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी उमेदवाराला लिखाण हे विश्लेषणात्मक आणि आकलन पूर्ण करावे लागते. खास करून या दोन्ही पेपर मध्ये भाषेवर प्रभुत्व असल्यास अधिक चे गुण मिळतात.
विचार करण्याचे माध्यम:
- उमेदवाराची शैक्षणिक पार्श्वभूमी ही कुठली असली तरी व्यक्ती ज्या भाषेत विचार करतो त्या भाषेत व्यक्तीला सहजपणे व्यक्त होता येते. राज्यसेवा मुख्य परीक्षेत विविध मुद्द्यांवर, विविध अंगी उत्तरे लिहावे लागतात. अशा वेळी उमेदवाराला कमी वेळात ज्या भाषेत व्यक्त होता येत असेल उमेदवाराने ते माध्यम निवडावे.
- राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम फार विस्तृत प्रकारचा आहे आणि मुख्य परीक्षेत जास्त गुण मिळवण्यासाठी विषयाच्या समाजाबरोबरच त्याचा संक्षिप्त नोट्स फार महत्त्वाच्या आहेत. अशा संक्षिप्त नोट्स मध्ये फक्त कीवर्ड्स लिहिले जातात जेणेकरून त्या कीवर्ड्सच्या आधारे उमेदवार परीक्षेत पूर्ण उत्तरे लिहू शकेल. अशावेळी उमेदवाराचे लेखनाचे माध्यम आणि विचार करण्याचे माध्यम भिन्न असल्यास कमी वेळात दर्जेदार उत्तरे लिहिता येत नाहीत. मुख्य परीक्षेचे किमान दोन पेपर एका दिवशी असल्याने पहिल्या पेपर मध्ये लागोपाठ तीन तास लिखाण केल्याने मेंदूवर प्रचंड ताण येतो व मेंदू थकतो , अशा अवस्थेत जर विचार करण्याचे आणि लिखाणाचे माध्यम भिन्न असेल तर प्रभावी वाक्यरचना आणि दर्जेदार उत्तर लिहिणे कठीण जाते व पर्यायी पेपर मध्ये कमी मार्क्स येतात.
शैक्षणिक पार्श्वभूमी:
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी भाषा निवडताना उमेदवार त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाषेची निवड करू शकतो. जर एखाद्या विद्यार्थ्याचे इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण झाले असल्यास तो उमेदवार इंग्रजीत सहज असल्यास ते माध्यम निवडू शकतो.- काही उमेदवार हे दहावीपर्यंत मराठी मिडीयम मधून आणि अकरावी पासून पुढचे शिक्षण इंग्रजी माध्यमात घेतलेले असू शकतात. असे उमेदवार इंग्रजीमध्ये सहज असल्यास इंग्रजी भाषा निवडू शकतात किंवा मराठी देखील निवडू शकतात.
- ज्या उमेदवारांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमात झाले असल्यास ते उमेदवार मराठी माध्यमाचा विचार करू शकतात.
- वरीलपैकी कुठलेही गटात न बसणारे उमेदवार स्वतःचे मूल्यांकन करून आणि परीक्षेच्या मागणीनुसार भाषेची निवड करू शकतात.
- वरील सर्व बाबींमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे हे आहे की उमेदवार कुठले माध्यम घेऊन कमीत कमी वेळात अंतिम निवडीस पात्र ठरू शकतो.
भाषा आणि अभ्यास सामग्री (Language vs Content):
भाषा आणि अभ्यास सामग्री यात तुलना केल्यास असे लक्षात येते की भाषा शिकण्यात आणि सुधारण्याची प्रक्रिया ही संदर्भ साहित्य अभ्यासण्याच्या प्रक्रियेच्या तुलनेने हळुवार/ क्रमाक्रमाने व कालांतराने सुधारणा होणारी प्रक्रिया आहे.- अभ्यासाचा कंटेंट विविध मार्गाने जसे की क्लासचा उपयोग करून, ग्रुप स्टडी करून तुलनेने कमी वेळात समजून घेता येतो व लक्षात ठेवता येतो, परंतु भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी वारंवार सराव व योग्य तो वेळ लागतो. त्यामुळे मला जर कोणी विचारले तर मी हा सल्ला देईल की राज्यसेवा मुख्यचे लिखाण माध्यम असे असवे कि अभ्यास करताना उमेदवाराला त्याच्या लिखाण माध्यमाचे दडपण येता कामा नये.
- उदाहरणार्थ: जर एका उमेदवाराला माध्यम ‘अ’ मध्ये (मराठी) चांगल्या पद्धतीने लिहिता येत असेल आणि त्या उमेदवाराला संदर्भ साहित्य माध्यम ‘ब’ (इंग्रजी) मधून वाचावे लागत असतील आणि त्यासाठी जास्त वेळ लागत असेल तरी त्या व्यक्तीस मी माध्यम अ’ (मराठी) निवडण्याचा सल्ला देईन. कारण की परीक्षेच्या अगोदर जास्त मेहनत करावी लागली तरी चालेल पण परीक्षा लिहीत असताना उमेदवाराला माध्यमाची भीती असता कामा नये.
- अपवाद जर उमेदवाराकडे वेळ असेल आणि उमेदवार इंग्रजी भाषेवर उपलब्ध असलेल्या वेळात प्रभुत्व मिळवू शकत असेल तर उमेदवार इंग्रजी माध्यमाचा देखील विचार करू शकता.